Saturday , July 6 2019
Home / भारतातील प्राचीन विद्यापीठे / अयोध्या विद्यापीठ ( इ. स. पूर्व ६०० )Ayodhya Ancient University | प्राचीन विद्यापीठे

अयोध्या विद्यापीठ ( इ. स. पूर्व ६०० )Ayodhya Ancient University | प्राचीन विद्यापीठे

अयोध्या विद्यापीठ ( इ. स. पूर्व ६०० )Ayodhya Ancient University-वाल्मीकि रामायणाच्या काळापासून अयोध्येचे नाव संस्कृत साहित्यात गाजत आलेले आहे. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे राजा दशरथाचे मुलगे; विशेषतः राजगुरु वसिष्ठ यांच्या रामायणातील चारित्र्याकडे लक्ष दिले म्हणजे अयोध्येत किंवा तत्कालीन प्रथेप्रमाणे नजीकच्या आश्रमांत राजपुत्रांना शिक्षण देण्याची उत्कृष्ट व्यवस्था असली पाहिजे याबद्दल विवादाला जागाच रहात नाही.

अयोध्या विद्यापीठ ( इ. स. पूर्व ६०० )Ayodhya Ancient University भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

अयोध्येच्या विद्यापीठाविषयी माहिती गोळा करताना मात्र प्रसिद्ध जैन साधू हेमचंद्र सूरी यांच्या ‘त्रिषष्टिशलाकापुरुष-चरित‘ या ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. या ग्रंथातील शैक्षणिक माहितीचा संक्षेप डॉ. दास यांनी आपल्या ‘जैन शिक्षण संप्रदाय‘ या ग्रंथात केलेला आहे.

‘त्रिषष्टि एलका पुरुष-चरित’ या ग्रंथावरून अयोध्येचे राजे ‘आर्हत’ ऋषभ हे विद्वान् सत्पुरुष होते हे कळते. यांच्या काळी पुरुषवर्गाला ७२ विद्या व स्त्रीवर्गाला ६४ विद्या शिकविण्याची पद्धत प्रचलित होती. या विद्यांची यादी प्रस्तुत पुस्तकातील वलभी विद्यापीठ गुणशीला विद्यापीठ यांवरील लेखात सादर केलेली आहे.

आर्हत ऋषभ राजाने आपला मुलगा राजपुत्र सगर याच्या शिक्षणाची व्यवस्था अयोध्या विद्यापीठात करवून घेतली. त्रिशष्टि शलाका पुरुष-चरित या ग्रंथात या राजपुत्राचा जो शिक्षणक्रम दिलेला आहे तो खरोखर अफाट आहे; आजच्या प्रगत विद्यापीठांनाही मान डोलावयास लावणारा आहे. राजपुत्र सगराच्या शिक्षणासंबंधाने जी माहिती या ग्रंथात येते ती सारांशरूपाने देणे मोठे उद्बोधक ठरेल.

राजपुत्र सगराचा शिक्षणक्रम

राजाच्या आदेशानुसार एक शुभ दिवस पाहून राजपुत्र सगराला गुरुगृही पाठविण्यात आले. हा दिवस सणासारखा साजरा करण्यात आला. गुरुगृही पोचल्या नंतर थोड्याच दिवसांत व्याकरणासारख्या अनेक विषयांनी राजपुत्राचे ठिकाणी नद्या ज्याप्रमाणे समुद्रात प्रवेश करतात त्याप्रमाणे प्रवेश केला. ( हे वाचीत असताना रघुवंशातील रघूच्या शिक्षणासंबंधी कालिदासाने लिहिलेल्या ‘ लिपेर्यथावग्रहणेन वाङ्मयं नदीमुखेनैव समुद्रमाविशत् ‘ या ओळीची आठवण झाल्यावाचून रहात नाही ). थोड्याच वेळात अष्टादश शास्त्रांचा प्रकाश राजपुत्राचे ठायी झाला. झोप येण्यापूर्वी तो काव्ये वाचीत असे, संतांची स्तोत्रे गाई.

अलंकारशास्त्रातील श्रेष्ठ अलंकारांची उदाहरणे चाळीत चाळीत त्याला झोप लागत असे. थोड्याच काळात धर्माची महान् तत्त्वे त्याने आत्मसात् केली, ‘स्याद्वाद’ संबंधाने प्रश्नोपप्रश्न विचारून त्याने आपल्या सहाध्यायांना जेरीस आणले. काही काळातच सहा नीती, चार राजसत्ता वगैरे भयंकर जलचरांनी युक्त असणा-या नीतीशास्त्र व अर्थशास्त्र यांच्या समुद्रात उडी मारून तो सहीसलामत बाहेर पडला. नंतर आयुर्वेदाची ‘अष्टांगे’ आपलीशी करून त्याने सर्व वनस्पतींचे ज्ञान मिळविले.

संगीत, नृत्यकला, नाट्य व वाद्ये यांचा चांगला परिचय करून घेतला; रतीचे चार प्रकारही त्याला माहीत झाले. हस्तिविद्येचे ज्ञान तर त्याला गुरूंनी विधिवत् न शिकविताच मिळाले. अश्वपरीक्षेबरोबर त्या काळी वाहन म्हणून उपयोगात येणा-या सर्व प्राण्यांविषयींचे संपूर्ण ज्ञानही त्याने प्राप्त करून घेतले. हे सर्व झाल्यानंतर राजपुत्र या नात्याने लष्करी शिक्षण घेण्याचा त्याने निर्णय घेतला.

धनुर्वेदाच्या शिक्षणाने याची सुरुवात झाली. नंतर इतर शस्त्रांची माहिती देणारे ग्रंथ त्याने मुखोद्गत केले व शस्त्रे हाताळण्यातही कौशल्य सम्पादन केले. सगराने या शिक्षणात हाताळलेल्या शस्त्रांची जी यादी या ग्रंथात दिलेली आहे. त्यात धनुष्यबाण, सर्व प्रकारच्या तलवारी व ढाली, बरची, जंबिये, भाले व गदा यांच्याप्रमाणे कु-हाडी लाठी, त्रिशूल, पट्टिश, दुष्फोट, भूसंधी, फेकून मारण्याचे दगड वगैरेंचाही समावेश आहे. यामुळे राजपुत्र सगर शस्त्रांची नावे पटापट सांगू शकत असे व त्यांचे प्रयोगही करून दाखवी.

या संक्षिप्त वर्णनावरून राजपुत्र सगराच्या चौफेर ज्ञानाची कल्पना येते. या शिक्षणक्रमात शास्त्र व व्यवहार म्हणजे आजच्या परिभाषेत Theory and Practicals या दोन्हींचा समावेश आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. यामुळे राजपुत्र सगराच्या अंगी असलेल्या सर्व गुणांना वाव मिळाला व विशेष म्हणजे आपल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेण्याची हातोटीही साधली.

सहाजिकच शिक्षणाचा अपव्यय झाला नाही. विद्याथ्र्यांच्या अंगातील सुप्त गुणांची जोपासना करून एकाग्रतेला पोषक व त्यांच्या कार्यशक्तीला प्रेरणा देणारे अनुकूल वातावरण निर्माण करणे ही आजच्या विद्याकेंद्रांची व विद्यापीठांची गरज आहे. ही गरज त्या काळची अयोध्या विद्यापीठासारखी विद्याकेंद्रे भागवीत असत व त्यामुळेच राजपुत्र सगरासारखे मेधावी व चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थी निर्माण होत असत हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

अयोध्या विद्यापीठ ( इ. स. पूर्व ६०० )Ayodhya Ancient University भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

About ipledge

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *