Home / भारतातील प्राचीन विद्यापीठे / काशी विद्यापीठ Kashi Vidyapeeth (इ.स.पूर्व १०००)भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

काशी विद्यापीठ Kashi Vidyapeeth (इ.स.पूर्व १०००)भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

काशी विद्यापीठ Kashi Vidyapeeth – भारतातील प्राचीन विद्यापीठे (Ancient Universities in India) भारताच्या धार्मिक व शैक्षणिक इतिहासात गंगेच्या काठावर वसलेल्या बनारस किंवा काशी या शहराला असाधारण महत्त्व आहे यात शंका नाही.

काशी विद्यापीठ Kashi Vidyapeeth ( इ. स. पूर्व १००० ते आजतागायत )भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

 

“अयोध्या मथुरा माया काशी काञवी अवन्तिका।

पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायकाः ।।”

या प्रसिद्ध श्लोकावरून मोक्षदायक ठिकाण म्हणजेच धर्मस्थान किंवा तीर्थक्षेत्र म्हणून काशी या शहराची प्रसिद्धी पुरातन आहे हे स्पष्ट होते.

धर्मस्थान म्हणजे यात्रेचे ठिकाण. म्हणूनच येथे थोर थोर विद्वान् येऊन राहू लागले व ‘ यदध्यासितमर्हद्भिः तद्धि तीर्थ प्रचक्षते ‘ म्हणजेच जेथे विद्वान वस्ती करतात ते तीर्थ या न्यायाने ही नगरी हळू हळू विद्यास्थान म्हणून गणली जावी हे स्वाभाविकच नव्हे का ?

उपनिषदांच्या काळापासून काशी या शहराचा उल्लेख आढळतो. शंकराच्या पूजेचे अद्यतन स्थान म्हणून काशी हे स्थान द्राविडांना आदरणीय व या  दैवताचा आर्यांनी स्वीकार केल्यानंतर त्यांच्या दृष्टीनेही हे विश्वेश्वराचे ठिकाण पूजनीय बनले.

भगवान्  गौतम बुद्धाने आपल्या धर्माची मूलतत्त्वे लोकांना पटवून देण्यासाठी या शहरातील मृगदान या जागेची निवड केली व स्वत: सारनाथच्या जवळ वास्तव्य केले. साहजिकच गौतम बौद्ध या शहराला वंदनीय मानतात.

जैनांचा तेवीसावा तीर्थकर सुपार्श्वनाथ याचा जन्म या शहरातच झाल्यामुळे जैनांनाही हे ठिकाण पवित्र वाटते.

धर्मक्षेत्र मानले गेल्यामुळेच या शहराचा संबंध भारतातील सर्व तत्त्वज्ञान्यांशी व वैष्णवभक्तांशी यावा हे अपरिहार्यच होते. आद्य श्रीशंकराचार्यांनी आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानाची ध्वजा फडकविण्यापूर्वी काशीतूनच मान्यता प्राप्त करून घेतली. श्री गौरांग महाप्रभू म्हणजेच श्री चैतन्य यांनी आपल्या बैष्णव पंथाच्या प्रसाराला येथूनच आरंभ केला. श्रीवल्लभाचार्याच्या पुष्टिमार्गाच्या प्रतिष्ठेचे हेच उगमस्थान. वैदिक धर्मामुळेच काशी संस्कृत भाषेच्या अध्ययनासाठी प्रसिद्ध झाली; ही प्रसिद्धी आजतागायत टिकून आहे. गौतम बौद्ध जातक-ग्रंथातून या शहराची चर्चा अनेक वेळा येते. कोशीय जातकात विचेचे स्थान म्हणून या शहराची कीर्ती गायिलेली आहे.

घरोघरी गुरुकुल या पाश्र्वभूमीवर काशी विद्यापीठाचा विचार करायला हवा. मुळात काशी हे धार्मिक चळवळीचे क्षेत्र व प्राधान्याने मोक्षदायक नगर असल्यामुळे यातील विद्यापीठाची तुलना तक्षशिला किंवा नालंदा या ठिकाणच्या विद्यापीठांशी करणे योग्य होणार नाही. निरनिराळ्या शास्त्रांत पारंगत अाचार्य व त्यांच्याकडे शास्त्र शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी एका ठिकाणी सापडणे कठीण; परंतु विद्वान् लोक संपूर्ण काशीभर पसरलेले असल्यामुळे प्रत्येकाकडे तुरळक विद्यार्थी असत. युएन त्सांग  हा चिनी प्रवासी सातव्या शतकात हिंदुस्थानात आला, त्यावेळी सुद्धा काशीत ३० बुद्ध-विहार व हिदूची १०० देवालये होती असा उल्लेख सापडतो. या सर्व विहारात व देवालयातच नव्हे तर काशीत अन्य ठिकाणी आश्रम करून मोठमोठे पंडित रहात असत व त्यांच्याजवळ ज्ञानलालसेने विद्यार्थी येत असत. दीग्धनिकायात एके ठिकाणी  ‘ नानादिशा – नानाजनपदाः- माणवकाः आगच्छन्ति ।’ असे म्हटलेले आहे ते वस्तुस्थितीचे निदर्शकच मानले पाहिजे. हे माणवक म्हणजे विद्यार्थी प्राधान्याने ब्राह्मण असत.

विहारात मात्र बौद्ध व जैन यांच्या परंपरेनुसार जातिभेद मानला जात नसे व वेद-वेदांगांशिवाय वेगवेगळया कलांचेही शिक्षण दिले जाई. खुद्द गौतमबुद्धाने गायनाच्या सर्व शाखांचे अध्ययन या ठिकाणी केले असे जातकात म्हटलेले आहे.

काशी येथील प्रत्यक्ष शिक्षणाची स्थिती काय होती याबद्दलची माहिती निरनिराळया ग्रंथातील व जातकांतील उल्लेखांवरून काढावी लागते. कोशीय जातक (क्र. १३०) व वित्तिरी जातक (क्र. ४३८) यानुसार विद्वान् आचार्य ३ वेद व १८ शिल्पे शिकवीत असत. येथील शिक्षणकार्याला प्रसेनजित किंवा बिंबिसार यासारख्या राजांनी फार मदत केली व बराच काळ प्रोत्साहन दिले. निरनिराळया आश्रमातील अभ्यासक्रमात साधारणपणे ४ वेद, ६ वेदांगे, इतिहास, पुराण व लोकायतम् या विषयांचा अंतर्भाव असे. येथे शिक्षण घेतलेल्या ब्राह्मणांना योग्य बक्षिसही मिळत असे. गहड़वाल राजांनी काशीच्या विद्वान् ब्राह्मणांना दिलेल्या दानाचे ताम्रपटही आता प्रकाशित झालेले आहेत. ही अर्थात् ११ व्या शतकातली म्हणजे बरीच अलीकडली स्थिती आहे. म्हणूनच शिक्षण-केंद्र म्हणून काशीचे महत्त्व अल्बेरूनीने मान्य केलेले आहे. १७ व्या शतकातील काशीच्या शिक्षणकार्याबद्दल लिहिताना बनिअरने सुसज्ज व नियमित कार्य करणा-या महाविद्यालयांच्या अभावावर नेमके बोट ठेवले, परंतु काशी शहराच्या निरनिराळ्या भागात विखुरलेल्या आचार्यांपैकी प्रत्येकाजवळ २ किंवा ४ पासून १२ ते १४ पर्यंत विद्यार्थी असत व यामुळे काशी शहरालाच एक प्रकारचे विद्यापीठ अशी संज्ञा देणे योग्य असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.

काशीतील संस्कृति-संगम (काशी विद्यापीठ Kashi Vidyapeeth)

काशी येथे नंतरच्या काळात वैदिक धर्माच्या शाळा स्थापन झाल्या; त्यांची भरभराट झाली, व्याकरण, अलंकार, वेदान्त, धर्मशास्त्र इत्यादी शास्त्रांचे पारंगत विद्वान् काशीत स्थायिक झाले हे खरे; परंतु तत्पूर्वी काशीत सर्व धर्माच्या बाबतीत सहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले होते. वैदिक धर्माचे अभिमानी, स्मार्त धर्माचे कट्टर पुरस्कर्ते, बौद्ध, जैन या सर्वांमध्ये एकोपा होता. गार्ग्य बालाकीसारखे विद्वान ब्राह्मण क्षत्रियांचे शिष्य बनण्यात कमीपणा मानत नसत; सुवया नावाच्या जोगिणींना सर्व धर्माच्या व सर्व पंथाच्या लोकांकडून भिक्षा मिळत असे. या जोगिणीही ज्ञानी असत. जैन धर्माच्या ११ अंगात पारंगत असणा-या सोमा नावाच्या जोगिणीचा उल्लेख निरयावलियाओत सापडतो. या सहिष्णुतेच्या वातावरणामुळे प्राचीन काळी देवालये, मंदिरे किंवा विहार यांच्यात भांडणे झाली नाहीत. हे पीक आधुनिक काळातच फोफावलेले दिसते.

काशीत धर्मप्रसार झाला व त्याच्या अनुषंगाने विद्येचा प्रसारही झाला याचे आणखी एक कारण म्हणजे काशी हे व्यापाराचे केन्द्र होते. दळणवळणाची साधने येथे विपुल प्रमाणात होती. कौशाम्बी व वाराणसी या प्रसिद्ध शहरांपर्यंत व येथून तक्षशिलेपर्यंत मोठाले रस्ते होते. विनयपिटकांत काशीहून राजगृहापर्यंत व श्रावस्तीपर्यंत गेलेल्या रस्त्यांचा उल्लेख आहे. शालू, रेशमी कापड यासाठी काशी प्रसिद्ध होते. ‘काशीविलेपन’, ‘काशीचंदन’, या प्रयोगावरून येथील सुगंधा पदार्थांच्या प्रसिद्धीची कल्पना येते. काशी जम्बुद्वीपाचा भाग होता व भरत, ब्रह्मदत्त वगैरे येथील राजे मोठे महत्त्वाकांक्षी होते. महाभारतात १०० ब्रह्मदत्त राजांचा संदर्भ येतो व मद्दसाला जातक  (नं. ४६५) किंवा विनयमहावग्ग (१०.२.३) यातील उल्लेखांवरून या शहराचे वैभव शिखराला पोचल्याचे कळते. जैन व बौद्ध व्यापा-यांनी काशीला समृद्धी प्राप्त करून दिली व त्यामुळेच या धर्मक्षेत्रात प्राचीन काळी विद्वान् पोसले जात असत; त्यांना योगक्षेमाची चिंता सतावत नसे. कोणी न कोणी श्रेष्ठी २-४ विद्वानांना आश्रय देणे अभिमानाचे मानत असे. अर्थात् त्यामुळे एकच सुसज्ज व नियमित विद्यापीठ होऊ शकले नाही; परंतु प्रत्येक विद्वान आपापली परंपरा वाढवू लागला व त्यामुळे संपूर्ण शहराला विद्यापीठाचे स्वरूप प्राप्त झाले हे अल्बेरूनीचे म्हणणे वस्तुस्थितीचे निदर्शकच आहे.

वैयक्तिकरीत्या विद्यादानाची प्राचीन परंपरा काही प्रमाणात आजही टिकून आहे हे राजेश्वरशास्त्री द्रविड, लक्ष्मणशास्त्री इत्यादी विद्वानांनी केलेल्या कार्यावरून व मिळवलेल्या प्रतिष्ठेवरून स्पष्ट आहे. इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झाल्यापासुन या प्राधीन नगरीचे नाव शैक्षणिक पटावरून पुसले जाण्याचा धोका निर्माण झाला होता, पण ख्स्तिवासी डॉ. अॅनी बेझंटबाईंनी स्थापलेल्या कॉलेजचे रूपांतर पंडित मदन मोहन मालवीयजींनी आजच्या सुप्रसिद्ध ‘ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ‘त (Banaras Hindu University) करून इंग्रजी आमदानीतही विद्यादानाची या शहराची परंपरा कायम ठेवली, इतकेच नव्हे तर तिला युगानुकूल प्रतिष्ठाही प्राप्त करून दिली. सुदैवाने या विद्यापीठाला विचारवंत म्हणून ख्यातनाम असलेल्या व्यक्ती उपकुलगुरू म्हणून लाभल्या, सुयोग्य प्राध्यापकवर्गाचे सहकार्य लाभले व या विद्यापीठाने शैक्षणिक विश्वात मानाचे स्थान मिळविले. वाराणसी संस्कृत विद्यापीठाने सध्याच्या काळातही संस्कृत भाषेच्या अध्ययनाची या शहराची प्राचीन परंपरा कायम टिकवलेली आहे ही समाधानाची बाब आहे. प्राचीन काळच्या काशी नगरीतील सहिष्णुता व तज्जन्य एकोपा यांची पुनः स्थापना करण्यात यश आले तर आधुनिक शैक्षणिक विश्वातही काशी नगरीचे नाव अविस्मरणीय ठरेल असे निश्चितपणे वाटते.

काशी विद्यापीठ Kashi Vidyapeeth

 

About ipledge

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *