Home / भारतातील प्राचीन विद्यापीठे / गुणशीला विद्यापीठ (इ.स.पूर्व ५००) स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करणारे प्राचीन विद्यापीठ

गुणशीला विद्यापीठ (इ.स.पूर्व ५००) स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करणारे प्राचीन विद्यापीठ

गुणशीला विद्यापीठ ( इ. स. पूर्व ५०० ) (भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India)-भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांतील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सम्मेलने भरवली व समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागविले गेले पाहिजे, त्यांना सर्व प्रकारचे हक्क मिळाले पाहिजेत ही घोषणा केली.

स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करणारे गुणशीला विद्यापीठ | ( इ. स. पूर्व ५०० )भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India

 

या वर्षाच्या स्मृती अद्यापी रेंगाळत असताना प्राचीन भारताने स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत केलेल्या कार्याचीही नोंद घेणे योग्य झाले असते. तसे व्हावे या उद्देशाने इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात एका प्राचीन विद्यापीठाने केलेल्या कार्याचा हा संक्षिप्त आढावा उद्बोधक ठरेल असे वाटते.

महान् जैन विद्यापीठ (गुणशीला विद्यापीठ)

या विद्यापीठाचे नाव गुणशीला विद्यापीठ. हे जैन विद्यापीठ राजगृह या नगरीत इसवी सनापूर्वी सुमारे सहाव्या शतकात होते. ही नगरी बिंबिसाराने बसविली असे इतिहासज्ञांचे म्हणणे आहे. या विद्यापीठात सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात असे. शास्त्रीय विषयांच्या शिक्षणाबरोबर आजच्या परिभाषेनुसार कलाशाखेत समाविष्ट होणा-या विषयांचे शिक्षणही देण्याची सोय येथे होती.

युद्धकलेसारख्या काही विषयांचे प्रात्यक्षिकही करवून घेतले जाई. श्रेणिक बिबिसाराचा राजपुत्र मेहा (मेघा) याचे शिक्षण या विद्यापीठात झाले होते असे डॉ. मजुमदार यांनी नमूद केलेले आहे. हा राजपुत्र सातव्या वर्षी या विद्यापीठात दाखल झाला व तत्कालीन प्रथेप्रमाणे १२ वर्षे त्याने येथे ७२ विद्यांचे अध्ययन केले. या ७२ विषयांत गणित, नृत्य, वाद्य, ज्योतिष, निरुक्त वगैरे विषयांप्रमाणे पत्रच्छेद्य ( पाने कापणे ), नखच्छेद्य ( सौंदर्यवर्धक पद्धतीने नखे कापणे ) यांसारख्या नाजुक कला; रसायन, विज्ञान, वैद्यक ही शास्त्रे, गंधवाद ( सुगधी द्रव्ये तयार करण्याची कला), वृक्षचिकित्सा, कृत्रिम मणिकर्म वगैरे व्यवहारोपयोगी विषयांचाही अंतर्भाव होता. वस्तुतः या ७२ विषयांची यादी पाहिली तरीही आजच्या विद्याथ्र्यांचे डोके गरगरू लागेल यात शंका नाही. यावरून त्या काळच्या जैन व बौद्ध आचार्यांनी लौकिक शिक्षणाचा प्रश्न कौशल्याने हाताळला होता असे दिसते.

या विद्यापीठात (गुणशीला विद्यापीठ) मुलांबरोबर मुलींनाही प्रवेश दिला जात असे असे ऐतिहासिक उल्लेखांवरून निश्चितपणे म्हणता येते. ज्या स्त्रियांना येथे शिक्षण दिले गेले त्यांत भुवमा व बिंबिसाराची पत्नी राणी नंदा या दोघींचा प्राधान्याने उल्लेख केला पाहिजे. महावीराने राणी नंदाला या विद्यापीठात प्रवेश देवविला यावरून या विद्यापीठाचे तत्कालीन महत्त्व सहज लक्षात येते. किंबहुना या काळात अनेक स्त्रियांनी बौद्ध किंवा जैन धर्म स्वीकारून निरनिराळया विहारांत शिक्षण घेतले असल्याचे दिसते. अशा स्त्रियांत बिंबिसाराच्या मित्राची मुलगी थेरीसामा, बिंबिसार राजाच्या दोन्ही बायका खेमा व नंदा, धम्मादिन्ना, अनुपमा, सुजाता यांचा उल्लेख करणे योग्य होईल. याबद्दलची अधिक माहिती श्री. एम्. व्ही. वेंकटेश्वर यांच्या India Culture through Ages या पुस्तकात मिळते.

स्त्रियांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात असे या प्रश्नाचे उत्तर त्यांना शिकविण्यात येणा-या ६४ विषयांच्या यादीवरून मिळू शकेल. ही यादी मात्र वात्स्यायनकृत कामसूत्र, कादंबरी, शुक्रनितीसार वगैरे ग्रंथांवरून तयार करावी लागते. प्राचीन काळातील प्रत्येक विद्यापीठात थोड्याफार फरकाने या यादीतील विषयच शिकवले जात असत असे म्हणण्यास हरकत नाही. ही यादी ( तवकरकृत प्राचीन भारतीय विद्यापीठे पृ. ११३-११४ ) पुढीलप्रमाणे–

 1. गीत, 
 2. वाद्य,
 3. नृत्य, 
 4. नाट्य,
 5. आलेख्य ( म्हणजेच चित्रकला ),
 6. विशेषकच्छेद्य-सौंदर्य प्रसाधनासाठी मुखावर करण्यात येणारी रंग-रचना-प्रत्याख्यातविशेषकं कुरबकं श्यामावदातारुणम – (मालविकाग्निमित्र – ३-५),
 7. तंडुल-कुसुम-बलि-विकार तांदुळाचे निरनिराळ्या प्रकारचे अन्न तयार करणे, फुलांच्या माळा, गजरे, गुच्छ वगैरे बनविणे ( वासवदत्ता या बाबतीत अत्यंत प्रवीण होती असा उल्लेख स्वप्नवासदत्तात आहे ) जेवणाचे वेळेस वाढपाची मांडणी करणे, 
 8. पुष्पास्तरण-फुलांची पखरण व बिछाना तयार करणे महार्हय्यापरिवर्तनच्युतैः स्वकेशपुष्पैरपि या स्म दूयते- ( कुमारसंभव ५-१२ ),
 9. दशनवसनाङ्गराग-दातांना रंग लावणे, वस्त्रे रंगवणे, शरीराचे अवयव चित्रित करणे, 
 10. मणिभूमिकाकर्म – घरातील जमीन शोभून दिसावी म्हणून त्यात खोदून रत्ने बसविणे,
 11. शयन-रचना,
 12. उदक-वाद्य ( आजच्या भाषेत जलतरंग ),
 13. उदक-धाट-निरनिराळ्या कारंजांची रचना करून बागेची शोभा वाढविणे, 
 14. माल्यग्रथन विकल्प-फुलांच्या माळा तयार करणे, 
 15. शेखरापीडयोजन –डोक्यावर फुलांची, रत्नांची भूषणे घालणे, 
 16. नेपथ्य, प्रयोग,
 17. कर्णपत्र भङ्ग – कानाजवळील गालांचे भाग रंगविणे,
 18. गंधयुक्तिसुगंधी द्रव्ये तयार करणे
 19. भूषणयोजन – निरनिराळ्या अवयवांवर अलंकारांची रचना करणे,
 20. इन्द्रजाल – गारुड्यांची विद्या,
 21. कुचमारयोगस्त्रियांची वक्षस्थळे टवटवीत ठेवण्याची कला
 22. हस्तलाघव — हस्तसामुद्रिक 
 23. विचित्रशाककूपभक्षविकार क्रिया – स्वयंपाकाची कला
 24. पाणकरसरागासवयोजन – निरनिराळी आसवे व पेये तयार करण्याची कला,
 25. सूचिवाय कर्म – शिवण्याची कला,
 26. सूत्रक्रीडा – दो-यांच्या साहाय्याने बाहुल्यांचे, खेळ करणे,
 27. वीडाडमरुवाद्य,
 28. प्रहेलिका – कोडी घालणे व सोडवणे
 29. प्रतिमाला – विशिष्ट अक्षर देऊन त्याने काव्याची सुरवात करणे,
 30. दुर्वाचक योग – निरनिराळ्या प्राण्यांच्या व इतरांच्या आवाजाचे अनकरण करणे,
 31. पुस्तकवाचन,
 32. नाटक आख्यायिका दर्शन ( मूकाभिनय ),
 33. काव्यसमस्या पूरण,
 34. पट्टिकावेत्रवान – विकल्प – धनुष्यबाण, वेताच्या वस्तू तयार करण्याची कला,
 35. तर्कुकर्म – सूत कातण्याची कला, 
 36. तक्षण – कोरीव काम,
 37. वास्तुविद्या – पक्ष्याच्या घरट्यापासून राजवाडा बांधण्यापर्यंतचे ज्ञान,
 38. सुवर्णरौप्यपरीक्षा,
 39. धातुवाद – अशुद्ध धातु शुद्ध करण्याची कला,
 40. मणिराग ज्ञान – रत्नांना रंग देण्याची कला,
 41. आकार ज्ञानखाण पाहून काढण्याचे ज्ञान,
 42. वृक्षायुर्वेद योग – झाडे वाढवण्याची कला
 43. मेषकुक्कुटलावकयुद्धविधि
 44. शुकसारिकालपन-पक्ष्यांना बोलायला, निरोप द्यायला शिकविणे,
 45. उत्सादन अङ्गर्दन 
 46. केशमार्जन कौशल – केशभूषेचे प्रकार,
 47. अक्षरमुष्टिकाकथन – मनातील अक्षर, मुठीतील वस्तू ओळखणे,
 48. स्लेच्छितविकल्प – गुप्त लिपी किंवा भाषा यांचे प्रयोग,
 49. देशभाषा ज्ञान
 50. निमित्तज्ञान – शकून सांगणे,
 51. यंत्रमातृका – ठसे ( ब्लॉक्स् ) तयार करणे,
 52. धारण मातृका – मनातील अर्थ गुप्त रीतीने व्यक्त करणारे काव्य करणे, 
 53. संपाठचं – गाण्यासाठी नोटेशन देणे, 
 54. मानसी काब्यक्रिया – शीघ्रकवित्व,
 55. अभिधान कोश,
 56. छंदोज्ञान,
 57. क्रिया विकल्प,
 58. छलितयोगा – हातचलाखी
 59. वस्त्रगोपन – साध्या वस्त्रांना रेशमाची चमक देणे,
 60. अक्षक्रीडा,
 61. बालक्रीडनक – मुलांकरिता खेळणी तयार करणे,
 62. वैनायिकीज्ञान, 
 63. वैजयिकी ज्ञान,
 64. व्यायामिकी ज्ञान.

ही यादी आजच्या हुषार विद्यार्थीनींचीही छाती दडपून टाकणारी आहे. परंतु या यादीकडे पाहिल्यानंतर यातल्या तंडुलकुसुमबलिविकार, पुष्पास्तरण, दशनवसनाङ्गराग, माल्यग्रथनविकल्प, भूषणयोजन यांसारख्या विषयांचे रूपांतर निरनिराळया शास्त्रांत व कलांत झालेले आहे, इतकेच नव्हे तर यांचे फायदेशीर व्यवसायात रूपान्तर झालेले आहे हे सहज लक्षात येईल. यांतल्या काही विषयांचा जर थोडाफारे अभ्यास झाला असेल तर स्त्रियांना दैनंदिन व्यवहारातही कौशल्याने काम करता येईल, हे मान्यच करावे लागेल. हे विषय प्रत्यक्ष शिकवले जात असत हे दाखवणारे शेकडो उतारे रामायण, भागवत, दशकुमारचरित यांसारख्या साहित्यिक कृतीतच नव्हे तर महाभाष्यासारख्या शास्त्रीय ग्रंथांत व नंतरच्या काळातल्या बौद्ध व जैन धर्मग्रंथांतही आढळतात. बहुश्रुतपणा व व्यवहारकौशल्य यांचा या शिक्षणात समन्वय झालेला दिसतो. असे शिक्षण स्त्रियांना देण्याची व्यवस्था ज्या देशातील गुणशीला विद्यापीठासारख्या संस्थांत होती त्यात निर्माण झालेल्या राजशेखरासारख्या नवव्या शतकातील कवीने आपल्या काव्यमीमांसेत ‘अवन्ती सुंदरी,’ विजयाङ्का, प्रभुदेवीं, वगैरे विख्यात विदुषींचा उल्लेख करावा व चालुक्य घराण्यातील सहाव्या विक्रमादित्याने राण्यांना निरनिराळ्या प्रांतांवर राजप्रतिनिधी म्हणून नेमावे यात नवल कसले ? विविध गुणांनी युक्त व शीलसंपन्न महिला ज्या विद्यापीठातून बाहेर पडत असत त्या विद्यापीठाचे ‘गुणशीला’ हे नाव सार्थक नव्हे का ?

 

गुणशीला विद्यापीठ ( इ. स. पूर्व ५०० ) (भारतातील प्राचीन विद्यापीठे Ancient Universities in India)

About ipledge

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *